शेल्टर नव्हे, नसबंदी व लसीकरणाचाच मार्ग योग्य!
भटक्या कुत्र्यांबाबत नवा आदेश

-सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/ 22 ऑगस्ट : भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक निर्णय दिला आहे. याआधीच्या आदेशात बदल करत, सर्व कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याऐवजी नसबंदी व लसीकरण हीच दीर्घकालीन उपाययोजना असेल, असे स्पष्ट करण्यात आले. न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, शेल्टरमधील सर्व कुत्र्यांचे प्रथम नसबंदी व लसीकरण करून त्यांना पुन्हा मोकळ्या वातावरणात सोडण्यात यावे. मात्र हिंसक वा रेबीजसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त कुत्र्यांनाच शेल्टरमध्ये ठेवता येणार, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यास मनाई करण्यात आली असून यासंदर्भात कठोर कायद्याची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त केले. या आदेशामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरता दिलासा मिळू शकतो. याआधी दिलेल्या आदेशानुसार सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये हलवण्याचे निर्देश होते; मात्र तो उपाय दीर्घकालीन व व्यवहार्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. नव्या निर्णयामुळे प्राणी कल्याण संघटना व स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले. नसबंदी व लसीकरणाद्वारे लोकसंख्या नियंत्रणासह सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते, अशी अपेक्षा आहे.




