स्वातंत्र्यासाठी आरएसएसचे अनेक नेते तुरुंगात गेले
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघाचे कौतुक

* संघाच्या शताब्दी सोहळ्यात हजेरी
नवी दिल्ली/1 ऑक्टोबर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीसोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या 100 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात 100 वर्षांत संघाने महत्त्वाचे योगदान दिले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संघाला वाहिलेले 100 रुपयांचे विशेष नाणे आणि पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण केले. 100 रुपयांच्या नाण्यावर भारतमातेची प्रतिमा कोरण्यात आली असून, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नाण्यावर भारतमातेला स्थान मिळाले आहे. दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शताब्दीनिमित्त काढलेल्या 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर “राष्ट्राय स्वाहा, इदम राष्ट्राय, इदम ना माम” असा संदेश कोरला आहे, ज्याचा अर्थ सर्वकाही राष्ट्राला समर्पित आहे, सर्व काही राष्ट्राचे आहे, माझे काहीही नाही असा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “राष्ट्र प्रथम” ही संघाची विचारसरणी होती, त्यामुळे ब्रिटिश आणि निजामच्या राजवटीत संघाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. शताब्दी सोहळ्यात बोलत असताना मोदी म्हणाले की, उद्या विजयादशमी आहे, ज्याचे आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे; वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय हे सणाचे प्रतीक आहे. 100 वर्षांपूर्वी या विजयादशमी निमित्त संघाची स्थापना करणे योगायोग नव्हते, तर ते हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा व संस्कृतीचे पुनरुत्थान होते. आपली पिढी भाग्यशाली आहे की, आपण संघाचा शताब्दी सोहळा पाहू शकलो.
* 100 च्या नाण्यावर सिंह आणि भारत माता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी सरकारने जारी केलेले विशेष टपाल तिकीट आणि नाणे खास आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, जारी करण्यात आलेल्या 100 (शंभर) रुपयांच्या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे, तर दुसऱ्या बाजूला सिंह आणि त्याच्यासोबत स्वयंसेवक भक्तीने नतमस्तक होत असलेली ‘भारत मातेची’ प्रतिमा आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जारी केलेले विशेष टपाल तिकीट देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, तसेच त्यांनी 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे महत्त्व सांगितले आणि एका ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली.




