बसवर दरड कोसळली; 15 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात, बचावकार्य सुरू

बिलासपूर/7 ऑक्टोबर – हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका बसवर दरड आणि असंख्य दगडांचा ढिगारा कोसळला, जो इतका मोठा होता की संपूर्ण बस त्याखाली दबली गेली. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, अद्यापही अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेवेळी डोंगरावरून मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड कोसळले आणि बसवर आदळले. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत तीन जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे आणि इतर अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी काम सुरू आहे. बिलासपूरचे उपायुक्त राहुल कुमार यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना या घटनेची पुष्टी केली असून 15 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. बसमध्ये एकूण 30 पेक्षा जास्त लोक होते, मात्र नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. घटनास्थळी जेसीबीच्या माध्यमातून ढिगारा उचलून बसमधील लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. पोलीस, अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. काही वेळात हिमाचलचे मंत्री मुकेश अग्निहोत्री देखील घटनास्थळी पोहोचणार आहेत.




