विजेचा झटका : तिघांचा अंत, तिघे गंभीर

पालम : रविवार 14 सप्टेंबर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालम शहरातील लोखंडी रोड परिसरात एक दुर्दैवी अपघात घडला. स्थानिक रहिवासी शेख शफीक शेख मुसा (वय 31, रा. बालाजी नगर, पालम) यांच्या पानटपरीला घराच्या दिशेने हलवत असताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन जोराचा झटका लागला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सिद्धार्थ नरहरी बावळे, 35, शेख शफीक शेख मुसा, 31, आणि शेख शौकत शेख मुसा, 40, अशी मृतकांची नावे आहेत. शेख शफीक यांनी पानटपरी बैलगाडीवर ठेवून हलवण्यास सुरुवात केली. बालाजी नगरमधील घराजवळ उतरत असताना, पानटपरी घसरून बैलगाडीवरील लोखंडी दांडी थेट विजेच्या तारेला लागली. या झटक्यामुळे घटनास्थळी उपस्थित व्यक्तींना जोरदार शॉक बसला.




