सरन्यायाधीश गवईंनी घेतली राष्ट्रपतींची तातडीची भेट
उपराष्ट्रपती निवडणुकीवर संशयाचे सावट

* न्यायालयीन हस्तक्षेपाची शक्यता?
नवी दिल्ली / 18 ऑगस्ट : देशात राजकीय वातावरण तापलेले असताना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांची राष्ट्रपती भवनात झालेली तातडीची भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा आणि त्यानंतर होणारी निवडणूक या घडामोडींनी दिल्लीतल्या सत्ताकेंद्रात खळबळ माजवली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला नवे उभारे मिळाले आहे. उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर आता नवी निवडणूक अपरिहार्य झाली आहे. या निवडणुकीत केवळ सत्ताधारी-विरोधकांचे अंकगणितच नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही विरोधी पक्षांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट शंका उपस्थित करत पारदर्शकतेचा मुद्दा उचलला आहे. त्यामुळे ही निवडणूक औपचारिक प्रक्रिया न राहता लोकशाहीवरील विेशासाची खरी कसोटी ठरणार आहे. या सार्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप अपेक्षित ठरू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे. नेमकी काय चर्चा झाली हे जाहीर झालेले नसले तरी सरन्यायाधीश गवई आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी निवडणूक प्रक्रिया, न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि संविधानिक संस्थांमधील समन्वय या मुद्द्यांवर मतविनिमय केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून सर्वोच्च पदावर विराजमान होणार्या पहिल्या महिला आहेत, तर भूषण गवई हे मागासवर्गीय घटकातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनलेले दुसरे न्यायमूर्ती आहेत. सामाजिक न्याय, समावेशकता आणि कायद्याच्या अधिराज्याचे हे दोन स्तंभ सोमवारी एका मंचावर आले. त्यामुळे या भेटीला केवळ औपचारिक सभ्यता न मानता तिच्या राजकीय-संविधानिक छटा शोधल्या जात आहेत. सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष, आगामी निवडणुकांवरील त्याचा परिणाम आणि निवडणूक आयोगावरील विेशासाचा प्रश्न, या सार्या घडामोडींनी देशाचे वातावरण तापवले आहे. या पोर्शभूमीवर राष्ट्रपती-सरन्यायाधीश भेटीमुळे दिल्लीच्या सत्ताकेंद्रात मोठीहालचाल होण्याची चिन्हे दिसत आहेत.




