दिवाळी रोजगार मेळाव्यात 51 हजारांना नियुक्ती पत्रे वाटप
पीएम मोदींनी स्टार्टअप्सवर दिला संदेश

नवी दिल्ली/24 ऑक्टोबर– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात नवनियुक्त अधिकार्यांना व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी 51,000 हून अधिक सरकारी नोकर्यांसाठी नियुक्ती पत्रे वाटप केली. पंतप्रधानांनी सांगितले की, देशभरातील रोजगार मेळ्यांमधून आतापर्यंत 11 लाखांहून अधिक भरती पत्रे देण्यात आली आहेत. त्यांनी असेही नमूद केले की भारताचे परराष्ट्र धोरण हे भारतातील तरुणांच्या हितावर केंद्रित आहे. अनेक देशांसोबत करण्यात आलेल्या करारांमुळे देशात गुंतवणूक वाढेल, तसेच स्टार्टअप्स आणि एमएसएमई क्षेत्राला पाठिंबा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि भारताची युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात या दृष्टिकोनासह आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहोत. आमचे परराष्ट्र धोरणदेखील भारतातील तरुणांच्या हितावर केंद्रित आहे. ते पुढे म्हणाले की, आमच्या राजनैतिक संवाद आणि जागतिक सामंजस्य करारांमध्ये युवा प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.




