एजंटांना सुरुवातीच्या 10 मिनिटांत बुकिंग बंदी

तिकीट बुकिंगमध्ये रेल्वेचे मोठे पाऊल

-सामान्य प्रवाशांना प्राधान्य, आधारची सक्ती
-1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
नवी दिल्ली/ 15 सप्टेंबर : रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी दररोज लागणारी धावपळ, इंटरनेटवर एक मिनिटात संपणारी प्रतीक्षायादी आणि दलालांच्या माध्यमातून होणारा काळाबाजार यावर अखेर रेल्वे प्रशासनाने तोडगा काढला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून, आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल पवर ऑनलाइन बुकिंगच्या सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी नवे नियम लागू होणार आहेत. या कालावधीत फक्त आधार प्रमाणीकरण केलेले साधे प्रवासीच बुकिंग करू शकतील, तर अधिकृत रेल्वे एजंटांना बुकिंगची परवानगी दहा मिनिटांनंतरच मिळेल.
रेल्वेच्या निर्णयामुळे बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांतच एजंटांकडून मोठ्या प्रमाणावर होणारे तिकीट आरक्षण थांबणार आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्राधान्याने तिकीटे मिळू शकतील. विशेषतः सणासुदीच्या किंवा सुट्टीच्या काळात एका मिनिटात तिकिटे गायब होण्याची समस्या आता कमी होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की या नियमामुळे पारदर्शकता वाढेल आणि काळाबाजाराला आळा बसेल. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत फक्त आधार ओटीपी प्रमाणीकरण केलेल्या खात्यांमधूनच बुकिंग शक्य असेल. त्यानंतर इतर वापरकर्त्यांनाही पूर्वीप्रमाणे तिकीटे बुक करता येतील. म्हणजेच, सुरुवातीची संधी केवळ खर्‍या प्रवाशांना मिळेल आणि एजंटांना या काळात हस्तक्षेप करता येणार नाही.
ऑनलाइन बुकिंगसाठी लागू होणारे हे नियम केवळ वेबसाईट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मपुरते मर्यादित आहेत. पीआरएस काउंटरवरून होणार्‍या तिकीट विक्रीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेत काउंटरमधून तिकिटे घेता येतील. आधीच एजंटांसाठी बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या 10 मिनिटांची मर्यादा लागू आहे. आता ती कायम ठेवण्यात आली असून, ऑनलाइन व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. रेल्वेच्या नव्या नियमानुसार, एजंटांना सर्वसामान्य बुकिंग सुरू झाल्यानंतर किमान 10 मिनिटे थांबावे लागेल. या बदलामुळे दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, पर्यटक तसेच सणासुदीच्या काळात टोळक्याने प्रवासाची योजना करणार्‍यांना तिकीट मिळण्यात मदत होणार आहे. प्रवाशांच्या मते, हा निर्णय योग्य वेळी घेण्यात आला असून साध्या लोकांसाठी तिकिटांची उपलब्धता सुलभ होईल.

संबंधित बातम्या

Back to top button