अखेर राहुल गांधींपुढे पोलीस नमले

दल्ली पोलिसांकडून सात तासानंतर एफआयआर दाखल

जखमी तरुणासह पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

नवी दिल्ली/21 ऑगस्ट : जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा कथित वापर केल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साहिल लोचव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले होते.

राहुल गांधी यांनी यापूर्वी पोलिस अधिकार्‍यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांच्या काही जवानांनी कथितरित्या पॅलेट गनचा वापर केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

पोलिसांकडून तत्काळ एफआयआर दाखल न झाल्याने राहुल गांधी डीसीपी कार्यालयाबाहेर धरण्यावर बसले. पॅलेट गन प्रकरणात एफआयआर दाखल होईपर्यंत ठिय्या सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाना मोठं यश मिळालं आहे.  धरणे आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांवर तरुणांशी कथित क्रुरपणे वागल्याचा आरोप केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते. परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संसद मार्ग पोलिस ठाण्याच्या परिसरातील सुरक्षा वाढवून बॅरिकेडिंग केली होती. तसेच कनॉट प्लेसच्या दिशेने येणारी वाहतूकही रोखण्यात आली होती.आता साहिल लोचव यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल झाल्याने या प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. एफआयआरमध्ये कोणत्या कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे आणि तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button