मुंबई लोकल दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील युवकाचा मृत्यू
मुंबई पोलीस दलात होता कार्यरत, देऊळगाव राजा तालुक्यात पसरली शोककळा

बुलढाणा /9 जून: मुंबई मध्ये झालेल्या भीषण ट्रेन अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचाही समावेश आहे. हा युवक मागील सुमारे चार वर्षांपासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्याच्या अपघाती निधनाची बातमी येऊन धडकताच देऊळगाव राजा तालुक्यात शोककळा पसरली. जुमडा गावातील त्याच्या परिवारासाठी हा खूप मोठा धक्का ठरला आहे. विकी मुख्यदल असे मृतक युवकाचे नाव आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत विकी मुख्यदल हा देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावाचा रहिवासी होता. आज सोमवारी, 9 जून रोजी सकाळी कसारा लोकलमधून प्रवास करणार्या काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील युवकाचा देखील समावेश असल्याने जिल्ह्यातही हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, आज विकी मुख्यदल हा लोकल ट्रेनने आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जात होता. लोकलमध्ये एकच गर्दी उसळल्याने तो लोकलच्या दरवाज्यात कर्तव्याच्या ठिकाणी जात होता. लोकलमध्ये एकच गर्दी उसळल्याने तो लोकलच्या दरवाज्यात (फूट बॉर्डवर) लटकून प्रवास करीत होता. अनेक प्रवासी अशाच तर्हेने दरवाज्यात लटकून प्रवास करीत होते. प्रवाशांच्या पाठीवरील बॅगा विरुद्ध दिशेने येणार्या पुष्पक एक्स्प्रेसला घासून गेल्यामुळे ते खाली पडले. मुंब्रा ते दिवा या रेल्वे स्थानक दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमावले. त्यात पोलीस विकी मुख्यदलचा देखील समावेश आहे.