गुरूकुंज आश्रमात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ

एक झाड तोडले, पाच झाडे तोडण्याचा प्रयत्न

तिवसा / 22 मे: चंदनाची झाडे कापून त्यातील गाभा लंपास करण्याच्या उद्देशाने अज्ञात चंदन तस्करांनी गुरुकुंज आश्रमातील चंदनाच्या झाडांना लक्ष्य करून रात्रीच्या काळोखात चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सहा ते सात चंदनाच्या झाडांपैकी तीन झाडांना चंदन तस्करांनी लक्ष्य करीत आरी व कटर सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला. यातील एका झाडाला कटरच्या साहाय्याने कापून यातील गाभा काढून नेण्यात आला.
हा प्रकार गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी चंदन तस्करांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाकडून करण्यात आली आहे. अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापित केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा आश्रम असून या आश्रमीय परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यातच सहा ते सात चंदनाची झाडे सुद्धा लागवड करण्यात आली आहे. गुरुकुंजातील आश्रमीय परिसरात लावण्यात आलेल्या चंदनाच्या झाडांना नष्ट करून त्यातील गाभा काढून नेण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी याकरिता लवकरच तिवसा पोलिस व वन विभागात तक्रार देण्यात येईल, असे गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button