मोर्शीत मध्यप्रदेशातून गुटख्याची अवैध तस्करी
एकाला अटक, 2.84 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोर्शी / 3 जून: मध्य प्रदेशातून मोर्शी मार्गे अमरावतीत प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची अवैध तस्करी करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. इंडिका कारमधून सालबर्डी, पाळा मार्गे गुटखा वाहून आणणार्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 34 हजार 700 रुपयांचा गुटखा आणि कार असा 2 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मोर्शी तालुक्याला लागून मध्यप्रदेशाची सिमा आहे. काही लोक सिमा हद्दीचा गैरफायदा घेवुन विविध प्रकारच्या अवैध व्यवसायायासाठी प्रतिबंधित मालाची मोठ्या प्रमाणात तस्करी करतात. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखाही चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आणला जातो. तालुक्यातील मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या सालबर्डी, पाळा या मार्गाने ही तस्करी चालते. सोमवारी अशाच पद्धतीने सुगंधित गुटख्याची मध्यप्रदेशातून खेप आणली जात असल्याची माहिती मोर्शी पोलिसांना मिळाली होती.
याआधारे पोलिसांनी पाळा मार्गावर नाकाबंदी करून आरोपी अब्दुल हाफिज शेख हैदर सौदागर (44, रा. ईस्लामपुरा, मोर्शी) याला टाटा इंडीका वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्या वाहनात प्रतिबंधित सुगंधित गुटख्याच्या विविध कंपनीच्या पुड्या आढळून आल्या. त्याची किंमत 34 हजार 700 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या गुटख्यासह तस्करीसाठी वापरलेली टाटा इंडिका कार क्र. एमएच 30 / एल 9768 पोलिसांनी जप्त केली आणि आरोपी अब्दुल हाफिजवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात आणि मोर्शीचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक शिवराज पवार, अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर यांनी केली.




