शहर राष्ट्रवादीने महापालिकेसाठी रणशिंग फुंकले

203 पदाधिकार्‍यांची जम्बो कार्यकारिणी जाहिर

-34 उपाध्यक्ष, 62 सरचिटणीसांची नियुक्ती
-59 सचिव, 38 संघटन सचिव, 10 सदस्यांचा समावेश
-किरकोळ फेरबदल, नवीन चेहर्‍यांना संधी
अमरावती / 18 मे: विधानसभा निवडणुकीत राज्यात आणि अमरावती मतदारसंघात मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यातही प्रामुख्याने अमरावती महापालिकेच्या निवडणुकीवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. आज गाडगेनगर येथे पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षाची शहर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहिर करुन महापालिका निवडणुकीसाठी एकप्रकारे रणशिंग फुंकण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही महिन्यांपासून सदस्यता नोंदणी अभियानाच्या माध्यमातून शहरात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचवेळी आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात पक्षाची पुर्नबांधणी केली जात असताना आज अनेक फेरबदलांसह पक्षाची जम्बो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. या कार्यकारिणीत 33 उपाध्यक्ष, 57 सचिव, 39 संघटक सचिव, 62 सरचिटणीस आणि 10 कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीत नविन चेहर्‍यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. सोबतच महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून विविध परिसरातील कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे. पदाधिकारी निवडताना समाजातील सर्वच घटकांचा विचार करण्यात आला असल्याचे दिसून येते. शहर कार्यकारिणीसोबतच सर्व 22 प्रभागांच्या अध्यक्षांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महाराष्ट्रात उत्तम कामगिरी केली. अमरावती मतदारसंघातही सुलभा खोडके यांच्या रुपात पक्षाने आमदारकी कायम राखली. त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाल्याने शहरात पक्षाची ताकद चांगलीच वाढली असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी आत्तापासूनच उत्साह दिसून येत आहे. तो अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी पक्षनेतृत्व प्रयत्नाला लागल्याचे चित्र आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज गाडगेनगर परिसरातील समाधी मंदिरासमोर असलेल्या सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करुन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष प्रशांत डवरे यांना कायम ठेवण्यात आले असून त्यांच्याच नेतृत्वात नविन कार्यकारिणी काम करणार आहे. यावेळी शहर उपाध्यक्ष म्हणून भोजराज काळे, जितेंद्रसिंह ठाकूर, रतन डेंडूले, भूषण बनसोड, सपना ठाकूर, मनीष बजाज, जयश्री मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तर शहर प्रवक्ता म्हणून माजी महापौर अ‍ॅड. किशोर शेळके, अविनाश मार्डीकर आणि प्रा. सनाउल्ला खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-राष्ट्रवादीशिवाय मनपात सत्ता स्थापने अशक्य : सुलभा खोडके
अमरावती महापालिकेसाठी सर्व राजकिय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनपा निवडणुकीसाठी कोणाशी युती किंवा आघाडी करायची, निवडणूक स्वबळावर लढवायची काय, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाईल. एक मात्र निश्चित आहे, अमरावती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय कोणालाही महापालिकेत सत्ता स्थापता येणे अशक्य आहे, असे सूचक वक्तव्य आ. सुलभा खोडके यांनी यावेळी बोलताना केले. अमरावती महापालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश प्राप्त कले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह अन्य अनेक महत्वपूर्ण पदांवर पक्षाने प्रतिनिधीत्व केले आहे. सद्या शहरात पक्षाला मोठा जनाधार प्राप्त आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश प्राप्त करुन देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वार्थाने कामाला लागावे, असे आवाहन सुलभा खोडके यांनी यावेळी केले.
-प्रत्येक घटकाला राष्ट्रवादीच्या प्रवाहात आणायचेय : संजय खोडके
यावेळी बोलताना आमदार संजय खोडके यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्यावर विदर्भ आणि प्रामुख्याने अमरावती विभागाची जबाबदारी सोपविली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पोहोचून आपण संबंधितांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समाजातील प्रत्येक घटकाला सहकार्याचा हात देण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रत्येक समाजाचे प्रश्न वेगळे आहेत. ते सोडविण्यासाठी कृती कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून राबवायचा आहे. आपले नेते अजित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. प्रत्येक समाज घटकाला राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामावून घ्यायचे आहे. त्यानुसार सर्वच समाजघटकांना प्रतिनिधीत्व देण्यावर भर असल्याचे संजय खोडके म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button