बिबट्याचे बस्तान रतन इंडियाच्या आवारातच
वनविभागाकडून शोध सुरु

-कामगार, नागरिकांमध्ये दहशत
नांदगाव पेठ/ 16 मे : रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात बुधवारी सायंकाळी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्यानंतर कॅमेरातही त्याचे दर्शन घडले होते. वन विभागाने गुरुवारपासून कंपनीच्या आवारात बिबट्याची शोध मोहिम सुरू केली असली तरी अद्यापही त्याला रेस्क्यु करण्यात यश मिळालेले नाही. बिबट्याने रतन इंडिया कंपनीच्या आवरातच बस्तान मांडले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकच कामगार आणि परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.
गुरुवारी रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. शुक्रवारपासून वनपाल अमोल गावनेर, श्याम देशमुख, फिरोज खान तसेच वनरक्षक अतुल धस्कट आणि संदीप ठाकरे यांनी पुन्हा परिसरात बिबट्याचा शोध सुरु केला. मात्र, दुसर्या दिवशीही बिबट्याचा पत्ता लागला नाही किंवा तो येथे असल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. त्याचवेळी तो आवारात निघून गेल्याबाबतही स्पष्टता नाही, त्यामुळे कामगार, नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात सतत गस्त वाढवण्यात आली असून, वनविभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाच्या सूत्रांनुसार, शोधमोहीम पुढील काही दिवस सुरु राहणार असून परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेर्यांद्वारे देखील बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे.
दरम्यान, प्रकल्प प्रशासन आणि स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत. रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाचा परिसर 1350 एकर जागेत पसरला आहे. जेथे कामगार काम करतात तो परिसर सोडला तर हजार एकर परिसरात जंगल आहे. त्यामध्ये रानडुकरे, हरीण, ससे आदी जंगली प्राणी देखील आहेत. येथे तलाव सुद्धा आहे. त्यामुळे बिबट्याला शिकार आणि पाणी मुबलक उपलब्ध असल्याने तो याच परिसरात दडून बसला असावा अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. एवढ्या मोठ्या जंगल परिसरात शोधमोहीम राबविणे वनविभागासाठी मोठे आव्हान ठरत आहे.