आजाराला कंटाळून विवाहित युवकाची आत्महत्या

बडनेरा / 16 मे: एका 45 वर्षीय विवाहित युवकाने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास लावला आणि आत्महत्या केली. ही घटना बडनेरा बारीपूरा परिसरात घडली. अजय गुलाबराव दारोकार असे मृतकाचे नाव आहे.
अजय हा गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होता. लिव्हर निकामी झाल्याने सतत पोट दुखायचे. त्या वेदना असह्य होत असल्याने मी फाशी घेतो, असे सतत म्हणायचा. अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी त्याने बारीपूरा भागातील आपल्या राहत्या घरातील खोलीत एकटा असताना गळफास लावला व जीवनयात्रा संपविली. यावेळी घरी असलेल्या अजयच्या मुलीच्या ही गोष्ट लक्षात आली. तिने आरडाओरडा केला असता शेजारी तेथे आले. अजयला खाली काढण्यात आले तेव्हा त्याचा मृत्यु झाला होता. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.