शौर्य व शिस्तबद्धता सोबतच एनसीसीच्या कॅडेटनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा

आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन

* 8 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अमरावती येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रम

अमरावती /5 जून: विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती ,शौर्य,शिस्तबद्धता भावना निर्माण करून जनसेवा व देशसेवेची भावना निर्माण करण्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे मोठे कार्य आहे. एनसीसीच्या प्रत्येक शिबिरात होणारे प्रशिक्षण व उपक्रम हे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतु आजच्या आधुनिक व डिजिटल काळात अनेक तांत्रिक संसाधनांच्या वापरामुळे मानवाला पर्यावरणाचा विसर पडत चालला असल्याने त्याचे विपरीत परिणाम वसुंधरेवर उमटू लागले आहे.
निसर्गाचा समतोल अबाधित राखण्यासाठी माणसाचे नाते निसर्गाशी जोडणे महत्वाचे आहे. त्यामुळे एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन घडून आणण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व्हीएमव्ही मार्ग स्थित 8 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अमरावतीच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी 8 महाराष्ट्र बटालियन एनसीसीअमरावतीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रवींद्र कुमार तर प्रमुख अतिथी म्हणून आ. सौ.सुलभाताई खोडके, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथजी पोकळे, अमरावतीत ग्रूपचे डेप्युटी ग्रुप कमांडर धर्मवीर सिंह, सहायक जिल्हाधिकारी मिनू पीएम, जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल बोडखे, महर्षी पब्लिक स्कूल अमरावतीचे प्राचार्य डॉ अबीन राज, 8 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सुभेदार मेजर सुलेमान शेख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एनसीसी कॅम्प परिसरात जवळपास दोन हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असून विविध प्रजातींची वृक्ष लागवड तसेच फळबाग फुलविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती एनसीसी व्यवस्थापनच्या वतीने देण्यात आली. या उपक्रमाची आमदार महोदयांनी प्रशंसा केली. अमरावती शहर स्वच्छ , सुंदर व हरित होत असतांना शाळा, महाविद्यालय परिसर तसेच शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. यासाठी युवकांनी तसेच विविध सामाजिक संघटनानी वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवावा,असे आवाहन सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. यावेळी आमदार महोदयांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. कार्यक्रमाला जे डी पाटील संगळूदकर महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.संतोष उके, सीताबाई संगई विद्यालय अंजनगाव सुर्जीचे एनसीसी ऑफिसर विशाल भेलांडे, जागृत विद्यालय वरुडचे एनसीसी ऑफिसर सुनील उईके, श्री जगदंब विद्यालय अचलपूरचे एनसीसी ऑफिसर प्रशांत शिरभाते, महर्षी पब्लिक स्कूलच्या एनसीसी ऑफिसर दिपाली वरघे तसेच 8 महाराष्ट्र बटालियन अमरावती अंतर्गत येणार्‍या सर्व महाविद्यालयांमधून आलेले एनसीसीचे 400 कॅडेट्स आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button