मोदींनी 8 वर्षांच्या ‘लूट महोत्सवाची’ जबाबदारी घ्यावी
हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, आत्मनिर्भरते’च्या उपदेशावरही प्रश्नचिन्ह

मुंबई /21 सप्टेंबर : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये 22 सप्टेंबर म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून जीएसटी बदल लागू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज (21 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटस्थापनेच्या पूर्णसंध्येला जीएसटी टॅक्स लागू होण्याला ‘बचत महोत्सव’ असे म्हणत देशाला संबोधित केले आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर विरोधक त्यांच्या टीकेसाठी पुढे आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सावकारी प्रमाणे जीएसटीचे दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु 2017 मध्ये मोदींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने जीएसटी आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांनी खूप आधीच सांगितले होते की, मोदींनी जीएसटीला गब्बर सिंग टॅक्समध्ये परिवर्तित केले आहे. दर कमी करून जनतेची लूट थांबवा अशी मागणीही त्यांनी सातत्याने केली होती. त्यावर निर्णय घ्यायला मोदींनी काही वर्ष उशीर केला. पेट्रोल-डिझेलच्या दरांवर मात्र मोदी गप्प आहेत. जनतेला स्वदेशीचा उपदेश करणारे पंतप्रधान स्वतः परदेशी गाड्या, घड्याळे, पेन व फोन वापरतात. ‘आत्मनिर्भरते’ची शिकवण देताना स्वतः मात्र ऐषआरामी जीवनशैलीत गुंतलेले आहेत. त्यांनी आज सांगितले की, हा बचत महोत्सव आहे, मग गेली आठ वर्ष काय लूट महोत्सव सुरू होता का? हेही त्यांनी सांगावे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणात उत्साह आणि आत्मविश्वासाची कमी होती. कदाचित देशभर घुमणारे ‘वोट चोर’, ‘गद्दी छोड’चे नारे आणि जनतेत वाढत चाललेली नाराजी याचेच ते प्रतिबिंब असावे. पंतप्रधानांनी लोकांची दिशाभूल करणार्या भाषणांपेक्षा महागाई, बेरोजगारी, शेती आणि शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.




