गृहमंत्री अमित शहा नागपूरात दाखल

तीन दिवस महाराष्ट्रामध्ये तळ

नागपूर/ 25 मे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौर्‍यावर आले असून रात्री ते नागपूरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यांचा मुक्काम शहरातील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहे. या दौर्‍याचा उद्देश नागपुरात होणार्‍या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणे आणि आणखी एका भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणे असा असून, हे कार्यक्रम उद्या पार पडणार आहेत. अमित शहा यांचे हॉटेलमध्ये आगमन झाल्यानंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून, संपूर्ण भागाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सध्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित असून, अमित शहा यांच्या सोबत थांबलेले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अमित शहा हे नागपूर शहरातील काही पदाधिकारी, महामंत्री आणि स्थानिक नेत्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधणार असल्याचे समजते. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, या दौर्‍याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button