भरधाव एसटी बसचे चाक निघाले
सातेगावजवळ थरारक घटना

-चालकाच्या तत्परतेने अनर्थ टळला
-40-45 प्रवासी सुखरुप
अंजनगावसुर्जी / 19 ऑगस्ट : गावंडगाव ते अमरावती या मार्गावर धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा मागील चक्का निघून बसपासून अलग झाला. सातेगावजवळ आज (दि.19) सकाळी घडलेल्या या घटनेत सुदैवाने 40 ते 45 प्रवासी सुखरूप बचावले. चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. सातेगावनजीक हा थरारक प्रकार घडला.
प्राप्त माहितीनुसार, एमएच-06-एस-8232 क्रमांकाची ही बस रोज सकाळी सात वाजता गावंडगाव येथून अमरावतीसाठी निघते. आजही ही बस नेहमीप्रमाणे सुटली होती. बसमध्ये शाळकरी विद्यार्थी तसेच जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी जाणारे नागरिक होते. दरम्यान, सातेगावच्या पुढे जात असतानाच बसचा मागील एक चक्का नट-बोल्ट सुटल्याने बसपासून निघून गेला. प्रसंगावधान राखत चालकाने त्वरित बस थांबवली आणि सर्व प्रवासी सुरक्षित उतरले. स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, परिवहन महामंडळाकडून गाड्यांची योग्य तांत्रिक तपासणी न करता रस्त्यावर सोडल्या जातात. जुने, कालबाह्य आणि धोकादायक बसेस प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत रस्त्यावर धावत आहेत, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.
बस रस्त्यावर धावण्यास योग्य आहे की नाही, याची जबाबदारी चालक आणि डेपो प्रशासनाने पार पाडणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात गंभीर निष्काळजीपणा दिसून आला, अशी प्रवाशांची प्रतिक्रिया होती. दरम्यान, या घटनेबाबत दर्यापूर आगार व्यवस्थापक अभिष बहुलकर यांनी माहिती देताना सांगितले की, घटनेची चौकशी करण्यात आली असून पाळी प्रमुख, यांत्रिक देखभाल कर्मचारी, वाहन परीक्षक तसेच चालक यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




