कोट्यवधींचे ऑक्सिजन प्रकल्प धूळखात

पाच वर्षांपासून यंत्रणा बंद, रुग्णालयांकडून सिलिंडर खरेदीवर लाखोंचा खर्च

दररोज 13.36 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता
तंत्रज्ञांअभावी सरकारी रुग्णालय लाभापासून वंचित

अमरावती/26 नोव्हेंबर – कोरोनाकाळात ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेले 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत पडले आहेत.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या यंत्रणांचा उपयोग होत नसल्याने सरकारी रुग्णालयांना आजही ऑक्सिजन सिलिंडर खरेदीवर लाखोंचा खर्च करावा लागत आहे. दररोज 13.36 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असतानाही रुग्णालयांना त्याचा लाभ मिळत नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची तीव्र कमतरता जाणवली होती. अनेक रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गमवावा लागला. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी केंद्र सरकार, पंतप्रधान निधी आणि अन्य आर्थिक स्रोतांतून जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, तंत्रज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचार्‍यांची नियुक्ती न झाल्याने या यंत्रणा सुरूच होऊ शकल्या नाहीत. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय, धारणी, तिवसा, चांदूर बाजार, वरूड, बेनोडा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, चांदूर रेल्वे, मोर्शी, दर्यापूर, अचलपूर आदी ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात आले. खासगी रुग्णालयांमध्येही ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बसवण्यात आली होती. परंतु, सरकारी यंत्रणा सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि देखभालीची व्यवस्था नसल्याने कोट्यवधींची गुंतवणूक निष्फळ ठरत आहे. आरोग्य विभागाने या प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करून प्रशिक्षित कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

खर्च सरकारी, लाभ मात्र शून्य

कोरोनाकाळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सरकारी रुग्णालयांत लाखोंचा खर्च करून यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, पाच वर्षांपासून त्या बंद असल्याने देखभाल, दुरुस्ती आणि गुंतवणुकीचा खर्च वाया जात आहे. रुग्णालयांना सिलिंडर खरेदी करावी लागत असून आर्थिक भार कायम आहे. प्रकल्प तातडीने सुरू केल्यास सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होईल.

 

Back to top button