धामणगाव जि.प. व पं.स.वर शिवसेनेचा झेंडा फडकवा

आ.बच्चू कडू यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

महिला शेतकरी आणि दिव्यांगांना मिळणार मदतीचा हात

3 जानेवारीपासून विशेष उपक्रम; ट्रॅक्टरने शेतांची मशागत करून देण्याचा निर्णय

अमरावती/26 नोव्हेंबर – धामणगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने संघटनवाढीसोबतच गरजू घटकांना मदत करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातील एकट्या महिला, विधवा महिला, महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी मदत केली जाणार आहे.
शिवसैनिक थेट शेताच्या बांधावर जाऊन ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करून देणार आहेत. ट्रॅक्टर शिवसेनेचा आणि डिझेल शेतकर्‍याचे, अशी या उपक्रमाची संकल्पना असून, 3 जानेवारीपासून सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी चांदूर रेल्वे येथील आनंद भवनात शिवसेना आणि प्रहार संघटनेची संवाद बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते आणि माजी मंत्री बच्चूभाऊ कडू होते. त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. गावागावांतील गरजू लाभार्थ्यांची माहिती गोळा करून त्यांची नोंदणी करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या. शेतजमिनीची मशागत करण्यासोबतच पाळी, बांध आणि फंटणची कामेही करून देण्याचे नियोजन आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गटात वाहनांवर धनुष्यबाण आणि प्रमुख नेत्यांची छायाचित्रे लावून प्रचार केला जाणार आहे. 6 डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर सायकल मोर्चा काढण्यात येणार असून, सर्व पदाधिकार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चूभाऊ कडू यांनी केले. आशीष धर्माळे यांनी धामणगाव मतदारसंघात शिवसेना सक्रियपणे काम करणार असल्याचे सांगितले. शाम देशमुख यांनी गावागावांत शाखाप्रमुख नेमण्याची गरज व्यक्त केली. यावेळी ज्ञानेश्वर धाने पाटील, राजेश पांडे, सुनील केणे, नीलेश तिवारी, पवन ठाकरे, जयश्री कातकरी, वैभव कोलवते, राजेंद्र लेंडगे, प्रशांत वैद्य यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे बच्चूभाऊ कडू यांनी स्वागत केले.

शेतकर्‍यांच्या बांधावर मदतीचा हात

शिवसेनेच्या या उपक्रमातून एकट्या महिला, विधवा महिला, महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकर्‍यांना शेतीच्या कामात आधार मिळणार आहे. शिवसैनिक स्वतः ट्रॅक्टर घेऊन शेतात पोहोचतील आणि मशागत करून देतील. ट्रॅक्टरचा खर्च शिवसेना करणार असून, डिझेलचा खर्च शेतकर्‍यांना करावा लागेल. 3 जानेवारीपासून सुरू होणार्‍या या मोहिमेसाठी गावनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार केली जाणार आहे.

Back to top button