दुष्काळग्रस्त शेतकर्यांना 1 लाख रिक्षा वाटणार
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई/26 नोव्हेंबर –राज्यात जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकर्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार आणि परिवहन विभागाकडून नव्या योजनेची चाचपणी सुरू आहे. राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांना 1 लाख रिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या योजनेचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 20 हजार रिक्षांचे वाटप केले जाणार आहे. लाभार्थी शेतकर्यांना रिक्षा खरेदीसाठी 90 टक्के कर्ज आणि 10 टक्के अनुदान देण्याचा विचार आहे. तसेच, या रिक्षाधारकांना आरटीओची फी देखील माफ करण्याचाही समावेश या प्रस्तावात आहे. या योजनेत राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांचा समावेश असेल. पात्र शेतकर्यांनी अर्ज केल्यानंतर म्हाडाच्या घरांप्रमाणे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. पहिल्या वर्षी 20 हजार शेतकर्यांना लाभ-या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या 310 किंवा भविष्यात वाढणार्या तालुक्यांमधील एकूण 20 हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांना रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी 60 लाभार्थ्यांना रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित उद्दिष्टापेक्षा कमी असल्यास उर्वरित रिक्षांचे वाटप त्याच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.





