सांस्कृतिक भवन कंत्राटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे तत्काळ आदेश
पालकमंत्री बावनकुळे यांची आ.पोटे यांच्या तक्रारीवर कारवाई

30 वर्षांचा खासगी करार आता रद्द होणार
भवन पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेतले जाणार
अमरावती /26 नोव्हेंबर- अमरावतीकरांच्या हक्काचे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन तीस वर्षांसाठी खाजगी कंत्राटदाराला देण्याच्या वादग्रस्त प्रकरणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आ. प्रवीण पोटे पाटील यांच्या लेखी तक्रारीनंतर पालकमंत्र्यांनी हे तत्काळ पाऊल उचलले असून या करारात गैरव्यवहार किंवा मूळ उद्देशाला बगल दिल्याचे आढळल्यास कंत्राट रद्द करून भवन पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेतले जाणार आहे.
अमरावती शहरातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सुमारे 20 वर्षांपूर्वी हे सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. मात्र गेल्या काही काळापासून या भवनाचा केवळ व्यावसायिक वापर सुरू झाल्याने कलाकारांवर मोठा अन्याय होत होता. या गंभीर प्रकाराकडे आ. प्रवीण पोटे पाटील यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांचे लक्ष वेधले होते. खाजगी कंत्राटदाराला 30 वर्षांसाठी दिलेला हा ठेका महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करणारा असून यामुळे भवन उभारणीचा मूळ उद्देशच हरवला असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला तातडीने आठ मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. इतक्या दीर्घ मुदतीसाठी कंत्राट देताना नेमक्या कोणत्या नियमांचा आधार घेण्यात आला याचा शोध घेतला जाणार आहे. तसेच कराराच्या अटींचा भंग झाला असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा ठेका तात्काळ रद्द करावा आणि गरज पडल्यास नियमात बदल करून भवनाचे नियंत्रण पुन्हा महापालिकेकडे घ्यावे असे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराला कोणतीही नवीन सवलत किंवा मुदतवाढ देऊ नये अशी तंबीही प्रशासनाला देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील नाट्यकर्मी आणि साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
चौकशी समितीसमोरील आठ महत्त्वाचे मुद्दे
कंत्राट सुरू झाल्यापासून आजपर्यंत कंत्राटदाराला मिळालेले उत्पन्न महापालिकेला मिळालेली रक्कम आणि देखभाल खर्चाचे विशेष लेखापरीक्षण केले जाईल. भवनाचा व्यावसायिक वापर रोखून स्थानिक नाट्य संस्था कलाकार आणि साहित्यिकांना सवलतीच्या दरात सभागृह उपलब्ध करून द्यावे तसेच व्यवस्थापनात कलावंतांचा सहभाग घ्यावा आणि कराराचा कायदेशीर पुनर्विचार करावा असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.





