उत्कर्ष नगरात फटाक्यांच्या ठिणगीने पेटला वणवा
नगरसेवकाच्या धावपळीने मोठा अनर्थ टळला

अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी विझवली आग
अमरावतीच्या कठोरा रोड परिसरातील घटना
अमरावती/24 नोव्हेंबर– कठोरा रोडवरील उत्कर्ष नगरात फटाक्यांच्या ठिणगीमुळे मोकळ्या जागेतील वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. वस्तीच्या अगदी जवळच आगीचे लोट पसरल्याने मोठा धोका निर्माण झाला होता, मात्र नगरसेवक चंदू खेडकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत स्वतः आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला आणि अग्निशमन दलाला पाचारण केल्याने मोठा अनर्थ टळला.
कठोरा रोड हा नेहमीच गजबजलेला भाग असून या परिसरातील उत्कर्ष नगरात दाट नागरी वस्ती आहे. या वस्तीला लागूनच असलेल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत आणि काटेरी झुडपे वाढली आहेत. सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी फटाके फोडले जात असताना त्यातील एक ठिणगी वाळलेल्या गवतावर पडली. उन्हामुळे गवत पूर्णपणे वाळलेले असल्याने आणि वार्याचा वेगही चांगला असल्याने आगीने बघता-बघता रौद्र रूप धारण केले. काही मिनिटांतच आगीचे मोठे लोट आकाशाच्या दिशेने झेपावू लागले आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले. आग आपल्या घरांपर्यंत पोहोचते की काय, या भीतीने उत्कर्ष नगरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आणि नागरिक घराबाहेर धावले.
ही बाब स्थानिक नगरसेवक चंदू खेडकर यांना समजताच त्यांनी कुठलाही विचार न करता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता आणि बाजूलाच असलेली दाट वस्ती पाहून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे त्यांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी ताबडतोब अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली आणि बंब तातडीने पाठवण्याची विनंती केली. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत थांबून न राहता चंदू खेडकर यांनी स्वतः पुढाकार घेत स्थानिक तरुण आणि रहिवाशांच्या मदतीने उपलब्ध साधनांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.काही वेळातच अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. नगरसेवक चंदू खेडकर यांनी स्वतः तिथे उभे राहून जवानांना वस्तीच्या बाजूने आग कशी रोखता येईल याची योग्य दिशा दाखवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत अथक परिश्रम घेतले आणि काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. वस्तीच्या तोंडाशीच आग रोखली गेल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी टळली. संकटाच्या वेळी स्वतः मैदानात उतरून मदत केल्याबद्दल उत्कर्ष नगर आणि कठोरा रोड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.





