नवभारत साक्षरतेच्या प्रश्नपत्रिका फुटीची भीती
प्रिंटर नसलेल्या शाळांत प्रश्नपत्रिका कशा पोहचवणार

अमरावती शिक्षक समितीचे प्रशासनाला तातडीने साकडे
अमरावती /23 ऑक्टोबर : केंद्र शासनाच्या ’उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’अंतर्गत येत्या 25 ऑक्टोबर रोजी होणार्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीच्या (ऋङछअढ) प्रश्नपत्रिकांची गोपनीयता धोक्यात आल्याचा थेट इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये इंटरनेट, संगणक आणि प्रिंटरचा मोठा अभाव असताना थेट पासवर्ड अन् पीडीएफद्वारे प्रश्नपत्रिका छापण्याचा निर्णय व्यवहार्य नसून, यामुळे गोपनीयता भंग पावून पेपर लीक होण्याची तीव्र भीती निर्माण झाली आहे; म्हणूनच परीक्षेच्या दिवशी ग्रामीण शाळांपर्यंत प्रश्नपत्रिका सुरक्षित पोहचवाव्यात, अशी ठाम मागणी समितीने प्रशासनाकडे केली आहे. समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर यांनी अमरावती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. निरक्षरांसाठी आयोजित या महत्त्वाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गोपनीय ठेवण्यासाठी केंद्रचालक व मुख्याध्यापकांना पासवर्ड आणि पीडीएफ उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये तंत्रज्ञानाची सोयच नसल्याने प्रत्यक्ष छपाई कशी करायची, असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. जिथे प्रिंटर उपलब्ध आहेत, तिथेही छपाईच्या वेळी पासवर्ड आणि प्रश्नपत्रिका फुटण्याचा मोठा धोका वर्तवला जात आहे.निरक्षरांच्या या चाचणीचे गांभीर्य ओळखून प्रश्नपत्रिकांची गोपनीयता सर्वोच्च प्राधान्याने जपली पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक शाळेत छपाईची सोय करावी किंवा परीक्षेच्या दिवशी अगोदरच नियोजन करून प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष पोहचवण्याची ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.





