आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
औषध भांडारात मुदत संपलेल्या 17 प्रकारच्या औषधांचा साठा

धारणी रुग्णालयातील आग आणि 12 रुग्णवाहिकांच्या वापरावर कारवाईची मागणी
अमरावती /23 ऑक्टोबर – अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कारभारातील त्रुटी, जिल्हा परिषदेच्या औषध भांडारात आढळलेली मुदत संपलेली 17 प्रकारची औषधे, धारणी येथील स्त्री रुग्णालयातील आगीची घटना, वापराविना पडून असलेल्या 12 रुग्णवाहिका आणि मेळघाटातील आरोग्य सुविधांची दुरवस्था या मुद्द्यांवर सामाजिक कार्यकर्ते समीर जवंजाळ यांनी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय काटकर यांची भेट घेऊन तक्रार केली. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध भांडारात मुदत संपलेली 17 प्रकारची औषधे आढळल्याचा मुद्दा जवंजाळ यांनी मांडला. औषधांचा साठा आणि वितरण यामध्ये निष्काळजीपणा झाला असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, असे त्यांनी सांगितले. औषधांच्या साठवणुकीतील हलगर्जीपणा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. धारणी येथील स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागातील दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून खरेदी केलेल्या 12 रुग्णवाहिका जिल्हा परिषद परिसरात दीर्घकाळ वापराविना उभ्या असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या रुग्णवाहिका संबंधित आरोग्य उपकेंद्रांकडे पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागांत माता-बालमृत्यू, वेळेवर उपचारांचा अभाव, वैद्यकीय अधिकार्यांची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समीर जवंजाळ यांनी केली.





