शिक्षक निवडणुकीसाठी विभागात अंदाजे 91.8 टक्के मतदान
गत निवडणुकीच्या तुलनेत 10 टक्क्याने मतदान वाढल्याचा अंदाज

32 हजार 515 गुरुजींनी बजावला मतदानाचा हक्क
मंगळवार 27 ऑक्टोबरला उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
वाशीममध्ये सर्वाधिक 92.87 टक्के मतदानाची नोंद
अमरावती/23 ऑक्टोबर : विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत शांततेत सरासरी 91.8 टक्के मतदान झाले. गत निवडणुकीच्या तुलनेत ते 10 टक्क्याने वाढले आहे. सर्वाधिक मतदान वाशीम जिल्ह्यात 92.87 टक्के झाले. एकूण 26 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या भाग्याचा फैसल मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
निवडणुकीसाठी विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम या पाच जिल्ह्यांत 81 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. एकूण 35 हजार 810 मतदार शिक्षकांपैकी जवळपास 32 हजार 515 शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. एका मतदान केंद्रावर 5 याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. अमरावती शहरात गर्ल्स हायस्कूल चौकात जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांचे बुथ होते. त्यामुळे समर्थकांची व नेत्यांची चांगली गर्दी होती. दुपारी 12 पर्यंत सरासरी 36.24 टक्के, दुपारी 2 वाजेपर्यंत 62.54 टक्के मतदान झाले होते. मतदाराच्या अंतिम वेळेपर्यंत 91.8 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 टक्क्याने मतदान वाढले आहे.
निवणुकीच्या रिंगणात किरण सरनाईक (शिवसेना), अदिती पोहरे (काँग्रेस), दत्तात्रय लहाने (शिवसेना उबाठा), सुरेश देवकर (शिक्षक भारती), श्रीकांत देशपांडे, संगीता शिंदे (मराशीप), चंद्रशेखर भोयर, दिलीप कडू यांच्यासह 26 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. चर्चा आणि दावे वेगवेगळे आहेत. लढत पंचरंगी झाली. दुसर्या आणि तिसर्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यापर्यंतची वेळ येऊ शकते, इतकी ही निवडणूक चुरशीची झाली आहे.
जिल्हानिहाय मतदान
अमरावती – 89.36 टक्के
अकोला – 92.12 टक्के
यवतमाळ – 92.17 टक्के
बुलढाणा – 90.75 टक्के
वाशीम – 92.87 टक्के
पहिली प्रतिष्ठेची तर दुसरी पसंती विजयाची!
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात गुरुवारी तब्बल 91.08 टक्के विक्रमी मतदान झाले, पण खरा निकाल पहिल्या पसंतीवर नाही तर दुसर्या पसंतीवर ठरणार आहे. रिंगणात 26 हून अधिक उमेदवार असल्याने पहिली पसंती मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. जिंकण्यासाठी 16,309 मतांचा कोटा लागणार असून पहिल्या फेरीत तो कोणालाही मिळणे अशक्य आहे. त्यामुळे सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होईल आणि त्याच्या मतपत्रिकेवरील दुसरी पसंती शिल्लक उमेदवारांना हस्तांतरित होईल. ही प्रक्रिया कोटा पूर्ण होईपर्यंत चालते. म्हणूनच राजकीय वर्तुळात म्हटले जाते की पहिली पसंती ही प्रतिष्ठेची असते तर दुसरी पसंती हीच प्रत्यक्ष विजयाची माळ घालते आणि सत्तेचा मार्ग मोकळा करते. म्हणून दुसरी पसंती निर्णायक ठरणार आहे.





