लाखोंचा खर्च तरी रुग्णालयात पुन्हा दुरुस्ती

बाह्यरुग्ण विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह, जुन्या इमारतीमुळे रुग्णसेवा विस्कळीत

अमरावती /22 ऑक्टोबर – इर्विन रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केलेल्या बाह्यरुग्ण विभागात पुन्हा काम सुरू झाल्याने रुग्णालयाच्या देखभालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जुन्या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी दुरुस्ती सुरू असली, तरी आधी खर्च केलेल्या पैशांनंतर पुन्हा काम करण्याची वेळ का आली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
इर्विन रुग्णालयाच्या इमारतीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरचनात्मक तपासणी करण्यात आली. त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप निरवणे यांनी दिली. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दुरुस्तीमुळे बाह्यरुग्ण विभाग एका लहान सभागृहात हलविण्यात आला आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या आणि जागेची कमतरता यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही रुग्णांना अन्य रुग्णालयांत पाठविण्याची वेळ येत आहे. डोळे आणि शस्त्रक्रिया विभागही दुसरीकडे हलविण्यात आले असून, तेथेही दुरुस्ती सुरू आहे. इर्विन रुग्णालयाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे इमारतीची सुरक्षितता महत्त्वाची असली, तरी दुरुस्तीचे योग्य नियोजन आणि खर्चाचा हिशेब जनतेसमोर येणे आवश्यक आहे

Back to top button