मत्स्यालय टाकी बांधकाम व मांडणी प्रशिक्षण

अनेक लाभार्थ्यांची उपस्थिती

अमरावती /22ऑक्टोबर  : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अमरावती यांच्या अर्थसहाय्याने आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती यांच्या वतीने 16 ऑक्टोबर 2026 रोजी मत्स्यव्यवसाय विकास व रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने मत्स्यालय टाकी बांधकाम व मांडणी प्रशिक्षण संपन्न झाले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात पार पडलेल्या या प्रशिक्षणात प्रातिनिधिक लाभार्थी सहभागी झाले. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त मॉन्टी मेश्राम यांनी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन केले. केवळ तलाव व तळी यातूनच मत्स्योत्पादनाद्वारे रोजगार मिळवणे हा उद्देश न ठेवता, ’मत्स्यसंपदा योजना’ अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना आणि मत्स्यालय टाकी बांधकाम व मांडणी यासारख्या आधुनिक व्यवसायांतूनही उत्तम रोजगार निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
’आत्मा’ च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित शेतकरी आणि मत्स्यकास्तकारांना पीएफएमई योजना,फूड प्रोसेसिंग युनिट, शेतकरी महिला प्रमाणपत्राबाबत, स्मार्ट योजना तसेच आत्मा व कृषी विषयक विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शेतकर्‍यांनी व मत्स्यकास्तकारांनी या योजनांचा लाभ घेऊन रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षण सत्रात मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी शपद्माकर बसवंत यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाचा उद्देश व इतर योजनांची माहिती दिली. ’आत्मा’ कार्यालयाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अनुप देशमुख यांनीही ’आत्मा’ अंतर्गत चालणार्‍या विविध योजनांवर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्रीराम वाघ उपस्थित होते. प्रशिक्षण सत्रात डॉ. भूषण सानप यांनी मत्स्यालय टाकी बांधकाम व मांडणी या विषयांतर्गत रंगीत माशांच्या जाती, प्रजाती, त्यांचे खाद्य, जोपासना, बाजारपेठेतील संधी आणि महाराष्ट्र राज्यासह जागतिक स्तरावर असणार्‍या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले.

Back to top button