अमरावती जिल्ह्यात गंभीर टंचाईचे सावट

जिल्हाधिकारी आशिष येरेकर पत्रकार परिषदेत माहिती

शेतीचे पंचनामे करून राज्याकडे 734 कोटींची मागणी

पाणी टंचाई सोडविण्यासाठी 1800 प्रकारच्या उपाययोजना

अमरावती /22 ऑक्टोबर – यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल 44 टक्के पाऊस कमी झाल्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांत अधिकृतपणे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. बाधित झालेल्या 5 लाख 16 हजार 256 शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडे 734 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
ऑगस्ट महिन्यात अवघा 14 टक्के पाऊस पडल्याने खरीप हंगामात मोठा फटका बसला असून अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, धारणी आणि तीवसा या सर्व तालुक्यांत टंचाईचे गडद सावट पसरले आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वात कमी 47 टक्के पाऊस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटून ते अवघे 5.7 क्विंटल प्रतिकर उरले असून एकूण 7 लाख 11 हजार 940 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने 1 हजार 28 गावांमध्ये 32 कोटी रुपये खर्चातून तब्बल 1 हजार 800 विविध उपाययोजना आखल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अप्पर वर्धा धरणासह मध्यम व लघु प्रकल्पांमधून 10 टक्के साठा राखून ठेवण्यात आला आहे. सोबतच 1 किलोमीटर परिसरात कूपनलिका खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील 8 लाख 47 हजार 139 पशुधनासाठी 100 दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याने चार्‍याच्या परजिल्ह्यात वाहतुकीवर व बाहेरून पशुधन आणण्यावर बंदी घातली आहे. रब्बी हंगामात पिकांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी शेतीसाठी 12 तास अखंड वीज देण्याचे आणि फीडर बिघडल्यास 48 तासांत दुरुस्ती करण्याचे कडक आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. संपूर्ण परिस्थितीवर आणि कर्मचार्‍यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ’डिस्ट्रिक्ट कनेक्ट’ प कार्यान्वित करण्यात आले आहे.

Back to top button