दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरले
घरात पत्नीचा तर परसोडा जंगलात मित्राची हत्या

आरोपीचे पोलीस ठाण्यात समर्पण; स्वतः दिली गुन्ह्याची कबुली
अमरावती /22 ऑक्टोबर – शहरातल्या अबूबकर कॉलनीत पतीने राहत्या घरात पत्नीचा गळा आवळून काटा काढला आणि त्यानंतर काही वेळातच परसोडा जंगलात नेऊन स्वतःच्या जीवलग मित्राचाही जीव घेतला. एकाच दिवशी अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या थरारक दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. संशयित आरोपी पती रफीउल्ला खान हफीजउल्ला खान याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी परसोडा भागातील जंगलातून त्याच्या मित्राचा संशयास्पद मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
अबूबकर कॉलनीमध्ये सुन्नी मशिदीजवळ राहणार्या रफीउल्ला खान याने बुधवारी सकाळी 10 ते 11 च्या सुमारास पत्नी नसरीन बानो (वय 43) हिचा घरातच गळा दाबून खून केला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर आरोपी पतीने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो तिथून निघून गेला. नसरीन बानोयांची दोन्ही मुले सकाळी नेहमीप्रमाणे शिकवणीला गेली होती. मुले शिकवणीवरून घरी परतली तेव्हा त्यांना घराला कुलूप दिसले. आई-वडिलांचा फोन लागत नसल्याने मुले घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन थांबली. रात्री 10 वाजेपर्यंत वाट पाहूनही कुलूप न उघडल्याने अखेर त्यांनी शेजारी राहणार्या नातेवाईकांना हाक मारून बोलावले.
नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पलंगावर नसरीन बानो यांचा मृतदेह निपचित पडलेला दिसला. गळ्यात पांढरा गमछा आवळून त्यांचा जीव घेतल्याचा संशय समोर आला. घरात आईचा मृतदेह पाहून मुलांनी हंबरडा फोडला आणि परिसरात एकच धावपळ उडाली. दरम्यानच्या काळात आरोपी रफीउल्ला खान याने पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत पत्नीला संपवल्याची माहिती दिली.
त्यानंतर त्याने पोलिसांना आणखी एक मोठा धक्का दिला. आपण पत्नीचा काटा काढल्यानंतर काही वेळातच आपला मित्र मन्नान ऊर्फ चाऊस यालाही जीवे मारल्याचे त्याने सांगितले. आरोपीच्या या गौप्यस्फोटाने उपस्थित अधिकार्यांचे डोके चक्रावून गेले. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलीस आणि फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने परसोडा जंगलात तात्काळ शोधमोहीम राबवली. झाडीझुडपात शोध घेऊन पोलिसांनी मन्नान ऊर्फ चाऊस याचा मृतदेह बाहेर काढला. मन्नान याचाही गळा आवळून थंड डोक्याने खून करण्यात आल्याचे समोर आले.या थरारक हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व अतुल वर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करून आवश्यक पुरावे गोळा केले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मालमत्तेचा व्यवहार करणार्या रफीउल्ला खान याने नेमक्या कोणत्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.





