जरांगे यांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

महायुतीच्या नेत्यांची थेट एसआयटी चौकशी करण्याची मागणी

जरांगेनी तक्रार दाखल करावी ः मंत्री बावनकुळे

मुंबई /22 ऑक्टोबर  :  मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींच्या आरोपांचा बॉम्ब फोडत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा एकदा खळबळ उडाली. या ऑडिओ पुराव्यानंतर महायुतीमधील नेते, तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी आक्रमक होत यावर प्रत्युत्तर दिले आहे. प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत आणि नवनाथ बन यांनी या प्रकरणाची थेट एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी जरांगेंना कुणी सुपारी दिली का? अशा संशय शिंदे गटातील नेत्यांकडून उपस्थित केला.
आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट ऑडिओ बॉम्ब टाकला. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगेना 500 कोटी पोहोचवल्याचा उल्लेख आहे. तसेच भाजपकडून षडयंत्र रचले जात असल्याचा दावा देखील मनोज जरांगेंनी केला.मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपवरून मंत्री उदय सामंत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करून आवाजाची सत्यता तपासली पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या क्लिपमध्ये भाजपशी संबंधित व्यक्ती असल्याचं सांगितलं जात असून, भाजपने याबाबत खुलासा करावा, असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे. चांगल्या पद्धतीने सुरू असलेलं मराठा आंदोलन बदनाम करण्याचा किंवा ते चिरडण्याचा प्रयत्न झाला होता का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत आपली भूमिका मांडली आहे. तसेच त्यांनी कोणासोबतही अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही मनोज जरांगे यांना असे वाटत असेल की, त्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना अडकवण्यासाठी कट रचला जात आहे, तर त्यांनी पोलिसात रीतसर तक्रार द्यावी. तक्रार कुठल्या पोलीस ठाण्यात किंवा यंत्रणेकडे गेली आहे हे तपासून शासन पुढील कारवाई करेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Back to top button