जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत स्वामी विवेकानंद मानवता गुरुकुलचा डंका

वरुड /21 ऑक्टोबर – जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करीत ढगा येथील स्वामी विवेकानंद मानवता गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची छाप उमटवली आहे. कलाजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विघ्नहर्ता उत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गट-अ मधून युगल अशोकराव वाळूलकर हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावुन गुरुकुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत गुरुकुलच्या एकूण 60 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती. गट-अ मधून युगल अशोक वाळूलकर हिने प्रथम क्रमांक मिळवुन जिल्हास्तरावर गुरुकुलचा नावलौकिक वाढविला. याच गटात प्रियांशु रोशन राऊत आणि प्रियांशु विशाल चाटरकर यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केले. याप्रसंगी कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चित्रकार युवराज ठाकरे, मुख्याध्यापक नितीन ठाकरे, गुरुकुलचे संस्थापक रंजित इंगोले, शिक्षिका कविता वंजारी, रुपाली बघेल, हर्षा वंजारी, ऋतुजा घोरमाडे आणि उदय घोरमाडे उपस्थित होते. रंगभरणासारख्या कलात्मक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, रंगसंगतीचे ज्ञान विकसित होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामी विवेकानंद मानवता गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मिळिवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.





