मारहाण करुन भावाने दिली जीवे मारण्याची धमकी
दिव्यांग महिलेचा पत्रकार परिषदेतून आरोप

अमरावती /21 ऑक्टोबर – 80 टक्के दिव्यांग असलेल्या तहमीना परवीन नियामत खान (रा. थुगाव, ता. चांदूर बाजार) यांनी आपले भाऊ नाजिम खान, अजीम खान आणि नजीम खान यांची पत्नी जीनत परवीन यांच्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. भावाने आपली म्हैस परस्पर विकल्याचे विचारल्यावर धमकी देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा, तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींवर कारवाई झाली नसल्याचा दावा तहमीना यांनी पत्रकार परिषदेत केला.
तहमीना परवीन यांनी सांगितले की, मी 80 टक्के दिव्यांग असून माझ्यात प्रतिकार करण्याची ताकद नाही. माझा आणि वडिलांचा उदरनिर्वाह दुग्धव्यवसायावर चालतो. मात्र, माझ्या भावाने परस्पर म्हैस विकून टाकली. याबाबत विचारणा केली असता मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर मी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले; मात्र पोलिसांनी तक्रार ऐकून घेण्यास तयारी दाखवली नाही. तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दिव्यांग संघटनेने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अखेर प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतरही संबंधित आरोपींवर कारवाई झाली नसल्याचे तहमीना यांनी सांगितले. या प्रकारामुळे घर सोडून नातेवाइकांकडे राहण्याची वेळ आल्याचेही त्यांनी नमूद केले. चांदूर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र मारोडकर यांच्याकडूनही दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार दिली; तरीही न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला तहमीना खान, सलीमा परवीन, तहसीम फातेमा आणि रुकसाना परवीन उपस्थित होत्या.





