5,347 गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई
दुर्गोत्सव काळात 331 जणांवर निर्बंध; 67 जणांची दोन वर्षांसाठी हद्दपारी

राजापेठ आणि फ्रेजरपुरा परिसरात सर्वाधिक कारवाया
प्रतिबंधात्मक उपायांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत गुन्ह्यांत 323 ने घट
अमरावती /19 ऑक्टोबर – सणासुदीच्या काळात शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम राबवली आहे.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली 17 ऑक्टोबरपर्यंत 5,347 नोंद असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये 331 जणांना दुर्गोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत निर्बंध घालण्यात आले, तर 67 जणांना दोन वर्षांसाठी अमरावती शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. या कारवायांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 323 ने घट झाली आहे. शहरातील 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय गुन्हेगार आणि नोंद असलेल्या गुन्हेगारांची माहिती गोळा करून ही मोहीम राबवण्यात आली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 925, तर फ्रेजरपुरा परिसरात 693 जणांवर कारवाई करण्यात आली. उर्वरित भागांतही पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 126 अंतर्गत 4,673 जणांवर, कलम 128 अंतर्गत 38 जणांवर, तर कलम 129 अंतर्गत 499 जणांवर कारवाई झाली. तसेच अवैध मद्यविक्रीप्रकरणी 137 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. नागपुरी गेट परिसरातील एका टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या आकडेवारी नुसार, यंदा 1 जानेवारी ते 17 ऑक्टोबरदरम्यान शहरात एकूण 2,242 गुन्हे नोंदवले गेले. गेल्या वर्षी याच काळात 2,565 गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा गुन्ह्यांची संख्या 323 ने कमी झाली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले. आगामी सणांमध्येही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त, गुन्हेगारांवर देखरेख आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्पष्ट केले.





