कन्या पूजन आणि भजनातून स्त्रीशक्तीचा गौरव

नवरात्रोत्सवाचा जल्लोष; सुलभा खोडके यांचे श्री जगदंबा दर्शन

अमरावती /19 ऑक्टोबर  : शहरात सध्या शारदीय नवरात्रोत्सवाचा मोठा सण भक्तिभावाने साजरा होत असून आदिशक्तीच्या गजराने अवघी अमरावती दुमदुमून गेली आहे. या पवित्र पर्वावर आ.सुलभा खोडके आणि यश खोडके यांनी शहरातील प्रमुख दुर्गाउत्सव मंडळांना भेटी देऊन श्री जगदंबेचे अत्यंत भाविकतेने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माता महागौरी आणि महिषासुरमर्दिनीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व नागरिकांच्या सुखासाठी व जगताच्या कल्याणासाठी साकडे घातले.
रविवार, 18 ऑक्टोबर रोजी अमरावतीतील शिलांगण रोड येथील जयभवानी महाकाली उत्सव मंडळ, भुतेश्वर चौक येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी लहान मुलींचे पूजन करून त्यांच्यात देवीचे रूप पाहणे, ही भारतीय संस्कृतीची महान परंपरा आहे. कन्या पूजन हा केवळ धार्मिक विधी नसून तो स्त्रीशक्ती, पवित्रता आणि आदिशक्तीच्या कुमारी रूपाचा खर्‍या अर्थाने सन्मान आहे. तसेच, नवरात्रात महिला भजनी मंडळांची सेवा म्हणजे भक्ति, शक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम असून यामुळे संपूर्ण वातावरण पवित्र आणि प्रसन्न बनते, असे मत आ.सुलभा खोडके यांनी यावेळी व्यक्त केले. या दौर्‍यादरम्यान त्यांनी अंबागेट येथील सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळ, राजापेठ मार्गावरील अंबा एकविरा व सत्यम नवदुर्गा उत्सव मंडळ, देशपांडे वाडी, मोची गल्लीतील श्री रक्षा नवदुर्गा मंडळ व तुळजाभवानी दुर्गाउत्सव मंडळ, गांधी चौक, गांधी चौक ते अंबागेट मार्गावरील विदर्भाची राणी आणि कासार पंच मंडळाचे श्री कालिका मंदिर संस्थान येथे भेट देऊन पूजा-अर्चा केली. तसेच सराफा बाजारातील श्री सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळ, वीर प्रताप नवदुर्गा मंडळ, खारकाडीपुरातील श्री शिवाजी नवदुर्गा उत्सव मंडळ, दहीसाथ परिसरातील प्रभात मंडळ, श्री सप्तसरसाथ गुजराती नवरात्री महोत्सव मंडळ आणि काळाराम मंदिर परिसरातील मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर गांधी चौक ते इतवारा बाजार मार्गावरील जय संतोषी माता मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी विविध उत्सव समित्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यांनी गरबा स्थळांनाही भेट देऊन भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व महाप्रसादाचे वाटप केले.

Back to top button