वाघामाईला नमन करूनच पुढील प्रवास
पोहरा जंगलातील प्राचीन जागृत श्रद्धास्थान

वाघ नतमस्तक झाल्याची आख्यायिका जिवंत
वाहनचालक भोंगा वाजवून घेतात देवीचे दर्शन
अमरावती /18 ऑक्टोबर – शहरापासूनच लागत असलेल्या अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरील पोहरा बंदीच्या घनदाट जंगलात असलेले वाघामाता देवीचे प्राचीन मंदिर आजही प्रवाशांचे आणि भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. अनेक वाहनचालक देवीला हात जोडून भोंगा वाजवूनच पुढचा प्रवास सुरू करतात. वाघ देवीसमोर नतमस्तक होत असल्याची जुनी आख्यायिका या मंदिराला वेगळी ओळख देते. जमिनीतून मूर्ती प्रकट झाल्याची श्रद्धा असून अश्विन आणि चैत्र नवरात्रात विशेष पूजा अन्नदान आणि महाप्रसादाने येथे भाविकांची मोठी गर्दी होते. पोहरा बंदीच्या जंगलात वसलेले हे वाघामाईचे मंदिर वर्षानुवर्षे भाविकांच्या मनात घर करून आहे. अमरावतीहून चांदूर रेल्वेकडे जाणार्या रस्त्यावर हे मंदिर लागते. या रस्त्याने रोज शेकडो वाहने ये-जा करतात. या मार्गावरून जाणारा प्रत्येक चालक गाडी थोडी थांबवून देवीला नमस्कार करतो. काही जण भोंगा वाजवून देवीचे नाव घेतात आणि मगच गाडी पुढे काढतात. ही परंपरा आजची नाही तर अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.
स्थानिक लोक सांगतात की या मंदिरातील देवीची मूर्ती जमिनीतून वर आली आहे. पूर्वी या संपूर्ण परिसरात घनदाट जंगल होते. त्या जंगलात पट्टेदार वाघ मोठ्या संख्येने फिरत होते. हे वाघ रात्रीच्या वेळी देवीच्या मंदिरासमोर येऊन डोके टेकवत होते. म्हणूनच या देवीला वाघामाई किंवा वाघाई असे नाव पडले. आजही मंदिराच्या आजूबाजूला दाट झाडी आहे आणि वन्य प्राण्यांचा वावर कायम आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना चालकांना गाडी जपून चालवावी लागते. नवरात्राच्या दिवसात या मंदिराला वेगळेच रूप येते. अश्विन आणि चैत्र अशा दोन्ही नवरात्रात येथे मोठा उत्सव होतो. नऊ दिवस रोज पूजा आरती आणि भजन होते. भाविक कुटुंबासह दर्शनाला येतात. सुख समृद्धी मिळावी म्हणून देवीच्या पायावर डोके ठेवतात. या काळात मंदिरात अन्नदान आणि महाप्रसादाचे वाटप केले जाते. जंगलात असूनही या दिवसात येथे भक्तीचे वातावरण भरून राहते. नियमित प्रवास करणार्या लोकांसाठी तर देवीचे स्मरण हा प्रवासाचाच एक भाग झाला आहे. जंगलाच्या कुशीत असलेले हे छोटेसे मंदिर आज श्रद्धा आणि विश्वासाचे मोठे केंद्र बनले आहे.





