अमरावतीत भरदिवसा बालाजी मंदिराच्या अध्यक्षावर हल्ला

दलालीच्या वादातून कात्री खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न

वडिलांवर वार अन् मुलाला जीवे मारण्याची धमकी

अमरावती /15 ऑक्टोबर – शहरातील प्रसिद्ध बालाजी संस्थान मंदिराचे अध्यक्ष महेश साहू यांच्यावर भरदिवसा जवाहर गेटजवळ कात्रीने सपासप वार करून जीवघेणा हल्ला चढवण्यात आला. दलालीच्या पैशांवरून झालेल्या वादातून हा थरार घडला असून हल्लेखोरांनी साहू यांच्या मुलालाही फोनवरून ठार मारण्याची धमकी दिल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रक्तबंबाळ झालेल्या महेश साहू यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
जवाहर गेट परिसरात घडलेल्या या खळबळजनक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणपसरले. महेश साहू आपल्या कार्यालयात असताना त्यांना संशयितांचा शिवीगाळ करत फोन आला. त्यांनी साहू यांच्याकडे ठिकाणाची विचारणा केली. त्यावर साहू यांनी आपण जवाहर गेट येथील संतोषी माता मंदिराजवळ असल्याचे सांगितले. काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिथे पोहोचताच कोणतीही दयामाया न दाखवता थेट धारदार कात्रीने साहू यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी वेळीच मध्यस्थी करत साहू यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत साहू यांनी आधी सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठले. तेथून वैद्यकीय तपासणीनंतर परत येत असताना त्यांना भोवळ आल्यामुळे तातडीने रेडियंट रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. साहू यांच्या जबाबावरून मनीष तुपटकर आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. एका व्यवहारातील दीड लाख रुपयांपैकी वीस हजार रुपयांच्या दलालीवरून हा वाद उफाळून आला होता. पैसे मिळाले नसतानाही दलालीसाठी हा रक्तरंजित खेळ खेळण्यात आला.या हल्ल्याच्या धक्क्यानंतर काही वेळातच साहू यांचे सुपुत्र सिद्धेश साहू यांनाही अज्ञात फोनवरून जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आली. याप्रकरणी सिद्धेश यांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. एकाच दिवशी वडील आणि मुलाला लक्ष्य केल्यामुळे अमरावती पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

Back to top button