न्यायव्यवस्थेवर कोणीही दबाव टाकू शकत नाही

राहुल गांधींवर सुप्रीम कोर्ट भडकले, स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस
एसआयआरच्या याचिकेवर सुनावणी

नवी दिल्ली/15 ऑक्टोबर :  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून गुरुवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली. तसेच, राहुल गांधी यांना समर्थकांसह सुप्रीम कोर्टात येण्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे, दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई, मेट्रो स्थानकांवरील निर्बंध आणि इंटरनेट सेवा बंद केल्याच्या आरोपांवरही न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवून न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. याशिवाय, जंतर-मंतर येथील आंदोलनाची जागा रद्द करण्याच्या मागणीवरून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनाही नोटीस बजावण्यात आली. निवडणूक आयोगाचे कामकाज आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवरून राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात संयुक्त याचिका दाखल केली आहे. या याचिकेत एकूण 13 जण याचिकाकर्ते आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर, मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळल्याच्या मुद्द्यावर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अधिकारांच्या वापरावर या याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत आणि मतदार यादीतील अनियमिततेची स्वतंत्र चौकशी करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली.

Back to top button