अंतिम मतदार यादी जाहीर; निवडणुकीचा मार्ग मोकळा

जिल्हा बँकेच्या यादीत 2825 मतदारांचा समावेश; दिवाळीपूर्वी कार्यक्रमाची शक्यता

न्यायालयीन आदेशानुसार दुरुस्तीची संधी कायम

अमरावती /14 ऑक्टोबर – अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अखेर 2825 मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधक तथा निवडणूक अधिकारी गौतम वर्धन यांनी ही यादी प्रसिद्ध केली. मतदार यादीवरील दावे आणि हरकतींमुळे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी अपेक्षा सहकार क्षेत्रातील पदाधिकार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. न्यायालयीन आदेशांनुसार यादीत आवश्यक दुरुस्ती करण्याची संधीही कायम ठेवण्यात आली आहे.
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नव्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. मात्र, मतदार यादीवरून दावे आणि हरकती दाखल झाल्याने निवडणुकीची प्रक्रिया रखडली होती. अखेर सहकार विभागाने वेळापत्रक आणि न्यायालयीन निर्णयांचा विचार करून अंतिम मतदार यादी जाहीर केली. अमरावतीतील इर्विन चौक परिसरातील जिल्हा बँकेच्या मुख्यालयात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक आणि विभागीय सहनिबंधक कार्यालयाची प्रक्रिया पूर्ण झाली. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार यादीत आवश्यक बदल केले जाऊ शकतात, असे निवडणूक अधिकारी गौतम वर्धन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर झाली असली, तरी न्यायालयीन आदेशांचे पालन करून पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि सभासदांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Back to top button