अमरावती शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद

आसोना गावाजवळ जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान

मोर्शी /14 ऑक्टोबर– अप्पर वर्धा धरणावरून अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बुधवारी सकाळी 9 वाजता मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा मोठा ते आसोना गावादरम्यान फुटली. जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अमरावतीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, दुरुस्तीसाठी गुरुवारचा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा 2 दिवसांपर्यंत विस्कळीत राहण्याची शक्यता असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
अप्पर वर्धा धरणापासून सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आसोना गावाजवळ ही घटना घडली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा विभागानेपाणी सोडणे बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, जलवाहिनी मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने दुरुस्तीला वेळ लागण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी लेवरकर यांनीही दुरुस्तीचे काम लांबण्याची शक्यता सांगितली.
दरम्यान, अमरावती शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू असताना खोदकाम करणार्‍या यंत्राचा धक्का लागल्याने ही जलवाहिनी फुटल्याचा दावा परिसरातील शेतकर्‍यांनी केला आहे. मात्र, जलवाहिनी फुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरातील काही शेतांमध्ये पाणी शिरले. हे पाणी जवळच्या नाल्याकडे वळविण्यात आल्याचे समजते. जलवाहिनीची दुरुस्ती लवकर पूर्ण करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

Back to top button