उद्योगांना वापरासाठी जिल्हाधिकार्‍यांचे सुधारित आदेश जारी

पशुधन चारा व्यतिरिक्त कुटार शिल्लक राहिल्यास

आ.सुलभा खोडके यांच्या पाठपुराव्याची दखल

ब्रिकेट/पेलेट्स निर्मिती उद्योग करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा दिलासा

उत्पादन समूहांकडून आ.खोडके यांचे आभार व अभिनंदन

अमरावती /13ऑक्टोबर : अमरावती जिल्ह्यात गुरांच्या चार्‍याची टंचाई रोखण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आशिष येरेकर यांनी शेतातील सोयाबीन आणि तूर पिकांचे कुटार (वैरण) केवळ जनावरांच्या चार्‍यासाठी आरक्षित ठेवण्याबाबत आदेश दिले होते. ?
या आदेशामुळे शेतकरी गड्डू निर्मिती उद्योगांसाठी कुटार खरेदी व वापरास काहीसा प्रतिबंध लावल्यात आल्याने बायोमास ब्रिकेट/पेलेट्स निर्मिती करणार्‍या शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या संदर्भात शेतकरी उद्योजकांनी अमरावतीच्या आ.सुलभा खोडके यांची भेट घेऊन सदरच्या आदेशामध्ये शिथिलता देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावर आमदार महोदयांनी तात्काळ जिल्हाधिकारी- आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत चर्चा केली असता आता जिल्हाधिकारी महोदयांनी या संदर्भातील आज दिनांक मंगळवार 3 ऑक्टोबर 2026 रोजी सुधारित आदेश जारी करून कुटार शिल्लक राहिल्यासच उद्योगांना वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदरचे सुधारित आदेश 9 ऑक्टोबर 2026 रोजी देण्यात आलेल्या मूळ आदेशातील इतर अटी कायम ठेवून तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून कुटाराच्या काळ्या बाजाराला चाप बसणार आहे. कुटारापासून बायोमास ब्रिकेट/पेलेट्स निर्मिती करणार्‍या शेतकर्‍यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असल्याने उत्पादक समूहांनी आ.सुलभा खोडके यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे. पशुधन असलेल्या शेतकर्‍यांनी सर्वप्रथम आपल्या पशुधनाच्या चार्‍यासाठी कुटाराची व्यवस्था करावी. त्यानंतर शिल्लक राहिलेले अतिरिक्त कुटार विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे. बायोमास ब्रिकेट/पेलेट्स निर्मिती करणार्‍या उद्योगांना त्यांच्या रोजच्या आवकच्या किमान 50 टक्के कुटार साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार इतर शेतकर्‍यांच्या उपलब्धतेसाठी राखीव ठेवावा लागेल. असे सुद्धा आदेशात नमूद करण्यात आले आहे. कुटार शिल्लक राहिल्यासच उद्योगांना वापरासाठी जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली असून यामुळे बायोमास ब्रिकेट/पेलेट्स निर्मिती करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल उत्पादक समूहांनी आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे. यावेळी अभिजित निंभोरकर, तेजस जामठे, अंकुश बंबाळ, प्रतीक तेलखाडे, उद्धव गोमासे, मयूर जैन, सागर शेळके, सागर देशमुख, सुमित चौखंडे, अनिल लोहपुरे, अमोल डहाके, श्री. जगमलानी, प्रतीक मालवीय, अजिंक्य गुडधे, आशुतोष लाहोटी, अनुप खलोकार, उपस्थित होते.

Back to top button