महामार्गावर ट्रक जळून खाक; वाहतूक ठप्प

पुण्याहून नागपूरकडे जाणार्‍या ट्रकला अचानक आग

अमरावती /12 ऑक्टोबर – नागपूर महामार्गावर महादेवखोरीजवळ सोमवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजताच्या सुमारास पुण्याहून नागपूरकडे विद्युत साहित्य घेऊन जाणार्‍या ट्रकला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. दरम्यान, वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याने समोरासमोर दोन वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील एक शिक्षिका जखमी झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुण्याहून नागपूरच्या दिशेने विद्युत साहित्य घेऊन जाणारा एमएच-48/बीएम-1787 क्रमांकाचा ट्रक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेवखोरीजवळील महामार्गावरून जात असताना अचानक पेटला. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच धावपळ उडाली. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता न आल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. याच वेळी एमएच-40/बीएल-9199 क्रमांकाचा ट्रक आणि एमएच-27/डीयू-5989 क्रमांकाची कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधून प्रवास करणारी एक शिक्षिका जखमी झाली.

Back to top button