पंचदीप दुर्गा मंडळाच्या देखाव्याचे उदघाटन

विलास इंगोले, रतन डेंडुळे यांची उपस्थिती

होम-हवन व महाआरतीने परिसर भक्तिमय

अमरावती /12 ऑक्टोबर – अंबापेठ परिसरातील पंचदीप दुर्गा मंडळात नवरात्रोत्सवानिमित्त भव्य देवीमूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि नगरसेविका रतन डेंडूळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. ‘मुलींचे संरक्षण’ या विषयावरील प्रबोधनात्मक फलकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मंडळाचे अध्यक्ष विनय सिंगारे, उपाध्यक्ष अभिषेक पंजाबी, सचिव शिवानंद चौधरी, सहसचिव डॉ. सौरभ राठी, कार्याध्यक्ष आशीष येवतीकर आणि स्वागताध्यक्ष राजेश साहू यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. पंचदीप मंडळाकडून अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवात भव्य देवीमूर्तीची स्थापना केली जाते. अंबादेवी आणि एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक पंचदीप मंडळातील देवीच्या दर्शनासाठीही आवर्जून येतात. रविवारी सायंकाळी मंडळाच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विधिवत होम-हवन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि आरतीत सहभाग नोंदविला. या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला सुरेश रतावा, अ‍ॅड. शिरीष जाखड, निलेश शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, मंडळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

Back to top button