नवरात्र उत्सवासाठी अमरावती मनपा प्रशासन सज्ज

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून राजकमल चौक ते अंबादेवी मंदिर परिसराची पाहणी

अमरावती/12 ऑक्टोबर  : शहरातील आराध्य दैवत श्री अंबादेवीच्या नवरात्रोत्सवासाठी अमरावती महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, भाविकांना सुरक्षित, स्वच्छ अन् सोयीस्कर वातावरणात दर्शन घेता यावे यासाठी कामांचा धडाका सुरू केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रविवारी संध्याकाळी 6 वाजता राजकमल चौक ते अंबादेवी मंदिर परिसराची थेट पाहणी केली आणि संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने चाचपणी केली. उत्सवाच्या काळात भाविकांची होणारी मोठी गर्दी, गरबा-दांडियाचे कार्यक्रम, धार्मिक सोहळे आणि बाजारपेठेतील आवक लक्षात घेऊन नागरिकांची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याचे कडक आदेश त्यांनी दिले आहेत.
11 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या या सोहळ्यात शहरातील मंदिर परिसर, प्रमुख चौक, बाजारपेठा अन् विसर्जन मार्गांवर मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर स्वच्छता विभागाने कचरा तुंबणार नाही याची काळजी घ्यावी, नियमित साफसफाई करावी, कचराकुंड्या ठेवून कचरा वेळोवेळी उचलावा, तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता अन् पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या दिवशी निर्माण होणारे निर्माल्य, फुले अन् पूजेचे साहित्य त्वरित उचलून रस्ते मोकळे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल्स, अतिक्रमणे, हातगाड्या आणि फेरीवाल्यांवर कारवाई करून वाहतुकीची कोंडी टाळण्याचे काम बाजार व परवाना विभाग आणि अतिक्रमण पथकाकडे सोपवण्यात आले आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी अन् विसर्जन मार्गांवर विजेची पूर्ण सोय असावी, नादुरुस्त दिवे तातडीने दुरुस्त करावेत, आणि वीजजोडणीची सुरक्षितता तपासावी, असे आदेश विद्युत विभागाला दिले आहेत. गर्दीच्या आणि मंडपांच्या ठिकाणी आगीची दुर्घटना टळावी यासाठी अग्निशामक दलाने आवश्यक ती यंत्रणा आणि आपत्कालीन मार्ग सज्ज ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पाचही झोनच्या साहाय्यक आयुक्तांनी आपापल्या भागातील नागरी सुविधांची तपासणी करून त्रुटी त्वरित दूर कराव्यात आणि केवळ पाहणीवर न थांबता प्रत्यक्ष अमलबजावणी करावी, असा सज्जड दमही आयुक्तांनी दिला आहे. भाविकांना भक्तीचा आनंद निर्विघ्नपणे घेता यावा यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन आणि पुरेसे मनुष्यबळ व वाहने उपलब्ध ठेवून काम करण्याचे निर्देश गोंदावले यांनी दिले. या पाहणी दौर्‍यात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, झोन क्रमांक 2 चे साहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, बाजार व परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त मंगेश कडू, उपअभियंता दिनेश हंबर्डे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्यासह महापालिकेचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button