‘क्यूएस’ रँकिंगमध्ये पटकावले मानाचे स्थान

कर्मचार्‍यांच्या समर्पणामुळेच विद्यापीठाची जागतिक पातळीवर घोडदौड

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन

अमरावती/31 ऑगस्ट- प्रशासकीय अडचणी, लालफितीचा कारभार आणि कर्मचार्‍यांची मोठी कमतरता असतानाही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या अहोरात्र निष्ठेमुळे विद्यापीठाने ’क्यूएस जागतिक क्रमवारी’त जगभरात 1000 ते 1200 च्या गटात तर दक्षिण आशियात 330 वा क्रमांक पटकावून उत्तुंग यश संपादन केले आहे.
कर्मचार्‍यांची पदे रिक्त असतानाही येथील सहकार्‍यांनी एकाच वेळी दोन ते तीन टेबलांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळून कामकाज अत्यंत सुरळीत ठेवले. या मोलाच्या सहकार्यामुळेच विद्यापीठाला हे आंतरराष्ट्रीय यश मिळाले असून भविष्यातही याच एकजुटीच्या बळावर विद्यापीठाची प्रगती अधिक वेगाने होईल, असा ठाम विश्वास कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी व्यक्त केला. निवृत्त कर्मचार्‍यांसाठी आयोजित ’कर्तव्यपूर्ती सोहळ्यात’ ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सोहळ्यात व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विद्या शर्मा, कुलसचिव डॉ. अविनाश अस्नारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सत्कारमूर्ती गणेश गोविंदराव व्यवहारे व व्यवहारे, अंजली देवानंद गणोरकर व देवानंद गणोरकर, तसेच रजनी सुनील चपाटे व सुनील चपाटे यांचा कुलगुरूंच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व गौरवपत्र देऊन भावूक वातावरणात सत्कार करण्यात आला. तसेच सोनाली तोटे-पाटील, पूनम जाधव आणि मनीषा कडू-हेकर यांनी सत्कारमूर्ती महिलांचा साडी-चोळी व हळदी-कुंकवाचा करंडा देऊन विशेष सन्मान केला. यावेळी डॉ. विद्या शर्मा यांनी निवृत्तीनंतरच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सांगत नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. नितीन कोळी व अजय देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती गणेश व्यवहारे, अंजली गणोरकर व रजनी चपाटे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेतर्फे राजेश एडले, सौ. प्रज्ञा बोंडे व डॉ. नितीन कोळी यांनी सत्कारमूर्तींना भागभांडवलाचा धनादेश व पुस्तके भेट दिली.

संबंधित बातम्या

Back to top button