रक्षाबंधनासाठी बसस्थानकांवर बहिणींची गर्दी
नागपूर अकोला व यवतमाळकडे जाणार्या बस खच्चून भरल्या

अमरावती /30 ऑगस्ट – रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमरावती शहरासह जिल्ह्यातील बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी माहेरी जाणार्या बहिणींमुळे सकाळपासूनच बसस्थानके गजबजून गेली होती. अमरावतीहून नागपूर, अकोला, यवतमाळसह विविध ग्रामीण मार्गांवर धावणार्या बस प्रवाशांनी खच्चून भरल्या होत्या. अनेक बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याने काही प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकावर सकाळपासून महिलांसह लहान मुलांची मोठी गर्दी होती. नागपूर, अकोला आणि यवतमाळकडे जाणार्या बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती. ग्रामीण भागातील प्रवाशांचीही मोठी संख्या होती. दयार्पूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, परतवाडा आणि अचलपूर मार्गावरील बसमध्येही गर्दी कायम होती. बसस्थानकाबाहेर राख्यांची दुकाने थाटण्यात आल्याने परिसराला सणाचे स्वरूप आले होते. प्रवासाच्या घाईत राखी खरेदी राहून गेलेल्या महिलांनी बसस्थानकाबाहेरील दुकानांतून राख्या घेतल्या. बसची प्रतीक्षा करणार्या प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गर्दीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असला तरी भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा बहिणींचा उत्साह मात्र कायम होता.




