श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धां

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपक्रम

अमरावती /30 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह आणि शिस्त यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे होते. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा शिक्षक डॉ. नितीन चव्हाळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी श्री शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली ठाकरे, पर्यवेक्षक शारदा फुले आणि महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका तथा गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ. पुष्पलता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला. 100, 200 आणि 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत विद्यार्थ्यांनी आपले क्रीडाकौशल्य दाखवून मैदान गाजवले. स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत: 200 मीटर शर्यतीत मुलींमध्ये शगुन डांबरे प्रथम, ईकेश्री मानकर द्वितीय व माहीत पिठले तृतीय आली; तर मुलांमध्ये प्रसन्न काळबांडे प्रथम, राजकुमार अंभोरे द्वितीय आणि साई पाटील तृतीय आला. 400 मीटर धावण्यात मुलींमध्ये केतकी श्रीरामराव प्रथम, मंजिरी उघाडे द्वितीय, ऋतुजा कुकडे तृतीय आली. मुलांमध्ये अथर्व शेंडगे प्रथम, रोहन मडावी द्वितीय आणि अनमोल परसवाणी याने तिसरा क्रमांक पटकावला. उद्घाटक डॉ. नितीन चव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच दररोज किमान एक तास खेळण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकत खेळाचे जीवनातील महत्त्व विशद केले.

संबंधित बातम्या

Back to top button