अभिनेता रोहुल्लाह मेहदीला ड्रग्ज प्रकरणात अटक
फिल्मी स्टाईल सापळा रचून दोघे ताब्यात

मुंबई /23 ऑगस्ट :मुंबईत बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन समोर आलं आहे. अभिनेता रोहुल्लाह मेहदीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काशीमीरा पोलिसांनी मीरा रोड परिसरातून 28 ग्रॅम ’एमडी’ ड्रग्स जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची अंदाजे किंमत 5 लाख 60 हजार रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
अभिनेता आणि मॉडेल रोहुल्लाह मेहदी उर्फ रोहू हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. काशीमीरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे अधिकारी संजय लोखंडे यांनी या कारवाईची माहिती दिली. सोशल मीडिया प्स स्नॅपचॅट आणि व्हॉट्सपच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची उघडपणे विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ग्राहक बनवून ड्रग्ज तस्करांना पकडलं. ऑपरेशनदरम्यान, 28 ग्रॅम एमडी ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी कासिफ नावाच्या व्यक्तीला दहिसर चेक नाका येथील ठाकूर मॉलजवळ बोलावण्यात आलं. पोलिसांनी तिथे सापळा रचून कासिफला रंगेहाथ पकडलं. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने अभिनेता रोहुल्लाह मेहदीचं नाव सांगितलं. कासिफने दिलेल्या माहितीच्या आधारे काशीमीरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मालाड येथील एका स्टुडिओबाहेरून रोहुल्लाहला अटक केली.
अभिनेता एका चित्रपटाचं शूटिंग करत असताना सेटवरच ही कारवाई करण्यात आली. रोहुल्लाह मेहदी हा मूळचा जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्याचा रहिवाशी असून सध्या तो मुंबईतील गोरेगाव परिसरात राहत होता. त्याने बॉलिवूड स्टार शाहिद कपूरसोबत ’देवा’ या चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय तो अनेक वेब सीरिजमध्येही दिसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




