विद्यापीठाचे विनियम महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड
प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांचे प्रतिपादन, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात कार्यशाळा

अमरावती/11 ऑगस्ट- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीनंतर राज्यातील महाविद्यालयांसमोर निर्माण झालेला शैक्षणिक कार्यभार आणि पदसंख्येचा गुंता अखेर सुटला आहे. यासंदर्भात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ऐतिहासिक पुढाकार घेत परिनियम क्रमांक 11 आणि 12/2026 निर्गमित केले असून, यामुळे कार्यभार निश्चितीची प्रक्रिया अत्यंत सोपी, अचूक आणि पारदर्शक झाली आहे. या धोरणाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे होते, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. दीपक धोटे उपस्थित होते. डॉ. धोटे यांनी विद्यापीठाची ऐतिहासिक भूमिका आणि परिनियमांची गरज स्पष्ट करताना सांगितले की, राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश नसताना विद्यापीठाने हे मार्गदर्शक सूत्र तयार करून संपूर्ण राज्याला दिशा दाखवली आहे. कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. दिनेश खेडकर यांनी संगणकीय एक्सेल प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांची संख्या नोंदवताच प्रत्येक विषयाचा कार्यभार कसा निश्चित होतो, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी या पारदर्शक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचे स्वागत करत, हीच कार्यप्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात लागू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनेश खेडकर यांनी केले, तर आभार डॉ. संदीप व्ही. वाघुळे यांनी मानले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, सायन्स डीन डॉ. हेमंत देशमुख, कॉमर्स डीन डॉ. अरुण हरणे, इंटरडिसीप्लिनरी डीन डॉ. वैशाली गुढे, उपकुलसचिव डॉ. ऋतुराज देशमुख आणि सहाय्यक कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.




