विद्यापीठातील गृहविज्ञान विभागात स्तनपान जनजागृती सप्ताह

अमरावती /7 ऑगस्ट– बाळाच्या निकोप वाढीसाठी आणि निरोगी समाजासाठी स्तनपानाचे महत्त्व घराघरांत पोहोचवण्याच्या उद्देशाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभागाच्या अन्नशास्त्र व पोषणशास्त्र पदव्युत्तर शाखेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून अनोखा जनजागृती उपक्रम राबवला. ’शाश्वत जीवनक्रमासाठी स्तनपान’ या संकल्पनेवर आधारित 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान आयोजित या सप्ताहात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने तयार केलेल्या माहितीपूर्ण चित्रफलकांद्वारे आणि प्रभावी तोंडी सादरीकरणातून समाजाला मोलाचा संदेश दिला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर हस्ताक्षर, आकर्षक चित्रे आणि आशयघन बोधवाक्यांचा वापर करत आईच्या पहिल्या दुधाचे (चिकाचे) महत्त्व, दुग्धवर्धक नैसर्गिक अन्नपदार्थ, स्तनपानाच्या योग्य पद्धती, कृत्रिम दुधाचे दुष्परिणाम, दुग्धपेढीची माहिती आणि बाटलीने दूध पाजण्याचे धोके यावर सखोल प्रकाश टाकला. नोकरी करणार्या मातांचे नियोजन, मुदतपूर्व जन्माला आलेल्या बाळांची काळजी, स्तनपानाबाबतचे गैरसमज दूर करणे आणि नवमातांना कुटुंबाकडून मिळणार्या सहकार्याचे महत्त्व याविषयी अत्यंत सोप्या भाषेत संवाद साधण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमात गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांनी बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासात स्तनपानाचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगत कुटुंबाच्या सहभागावर भर दिला. प्राध्यापक सुमित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला रवीशंभा आंबेकर, दिपाली म्हैसे, शिल्पा इंगोले, आयतल कामदार, अनुश्री आडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी अशोक हिरे, वसंत इंगळे, चरणदास जामठे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




